लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गरोदर महिलांनाही कोरोना लस देण्यात यावी की नाही, याबाबत अनेक दिवसांपासून असलेली द्विधावस्था शासन स्तरावरून संपुष्टात आणत, शुक्रवारपासून लसीकरणाला प्रारंभ करण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र, गर्भवती महिलांमध्ये अद्यापही लस घेण्याबाबत साशंकता कायम असल्याचे दिसून येत आहे, तसेच जिल्ह्यात गर्भवतींना लस सोमवारपासूनच उपलब्ध होणार असल्याने त्यानंतरच किती प्रमाणात गर्भवती महिला कोरोना लस घेतात, ते समजू शकणार आहे.
गरोदर महिला, तसेच स्तनदा मातांनाही लस घेता येणार असल्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्याप्रमाणे या लसीकरणाला प्रारंभ करण्याचे आदेश कागदोपत्री मनपा आणि जिल्हा आराेग्य विभागाला शनिवारी प्राप्त झाले आहेत. जेव्हापासून लसीकरण सुरू झाले आहे, तेव्हापासून गरोदर माता आणि स्तनपान करणाऱ्या माता यांना लसीकरण केले जावे अथवा जाऊ नये, याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतांतर होते, परंतु आता मात्र केंद्र शासनाने याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, आता गरोदर असलेल्या महिला आणि स्तनपान देणाऱ्या लहान बाळांच्या माता यांनाही लसीकरण सुरू केले जाणार आहे.
इन्फो
सहव्याधींची माहिती देणे आवश्यक
लसीबाबतच्या निर्णयामुळे आई होऊ पाहणाऱ्या महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका उद्भवण्याची भीती असणाऱ्या अनेक गरोदर महिला आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येण्याची शक्यता आहे. गरोदर मातांमध्येही ३५ वर्षांवरील मातांनी लस घेताना त्यांना असलेल्या सहव्याधींची माहिती डॉक्टरांना देऊन त्यांच्या सल्ल्याने लस घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित गरोदर मातांनी ट्रीटमेंट सुरू असलेल्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेऊन लस घेणे आवश्यक आहे.
इन्फो
लसींबाबत प्रतिसाद मिळण्याची चिन्हे
शहरासह जिल्ह्यातील बहुतांश स्त्रीरोग तज्ज्ञांना त्याबाबतही सल्ला विचारला जात आहे. गरोदर महिलांकडून लस घेण्याबाबत विचारणा होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्व स्त्रीरोग तज्ज्ञांकडूनही त्यांना लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे भविष्यात गरोदर आणि स्तनदा मातांकडून लस घेण्यास प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
-------
गर्भवती महिलांनी न घाबरता लस घ्यावी
गरोदर मातांना शहरातील हॉस्पिटल असणाऱ्या केंद्रांवरच लस देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी न घाबरता लस घेण्यास पुढाकार घ्यावा. शहरात लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर इच्छुक गरोदर मातांना सोमवारपासूनच लस देणे शक्य होणार आहे.
डॉ.अजिता साळुंखे, मनपा लसीकरण अधिकारी.
---------
दोन जीवांची भीती
लसींची उपलब्धता होण्यापूर्वी त्यावर केवळ सहा महिने संशोधन झाले आहे, तसेच विदेशात लस घेतलेल्या गर्भवतीवर काही विपरित परिणाम नसला, तरी त्या बाळावर काही परिणाम झाले आहेत का, याबाबतचे सखोल संशोधन करण्यासाठी तितका वेळही संबंधित शास्त्रज्ञांना, डॉक्टरांना मिळालेला नाही. त्यामुळे लस घेण्याची इच्छा असली, तरी काही काळ थांबून मगच लस घेणार आहे.
शिल्पा कत्परा, गर्भवती महिला
----
लवकरच लस घेणार
गर्भारपणाच्या काळात कोरोनाचा धोका होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेत आहे, तसेच लसीबाबत आमच्या डॉक्टरांशी चर्चा झाली असून, त्यांनी लस घ्यायला सांगितले आहे. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांशी त्याविषयी लवकरच बोलून निर्णय घेणार आहे. सर्वांच्या सहमतीनंतरच लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनाची लस घेणार आहे.
निर्मोही छत्रीशा, गर्भवती महिला
-------------------------------
ही डमी आहे.