इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथील गरोदर महिला वनिता भाऊ भगत यांची रस्त्याची पायपीट केल्यामुळे व उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. या महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन मृत्युस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणी मनसेने केली आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अभिजीत बारावकर यांना देण्यात आले.
जुनवणेवाडी, तळोघ, ता. इगतपुरी येथील वनिता भाऊ भगत हिचा दुर्देवी मृत्यु झालेला आहे. सदर महिला ही गरोदर असल्याने तिला डिलेव्हरीसाठी २३ रोजी मध्यरात्री जुनवणेवाडी ते तळोघ गावांपर्यंत पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने अक्षरक्षः डोली करून तिला तळोघ गावापर्यंत आणले. परंतु जुनवणेवाडी ते तळोघ हे अंतर साधारणतः ३ कि मी असल्याने तसेच तळोघ गावातही आरोग्याची व्यवस्था नसल्याने सदर महिलेस मृत्यु झालेला आहे.
इगतपुरी तालुक्यात असे अनेक वाड्या पाड्या आहेत की तेथे आजही पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येकवेळेस अशा असंख्य महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे. सदर वनिता भाऊ भगत व तिचे बाळाचे मृत्युस शासकीय अधिकारी हेच जबाबदार आहेत. महिलांचे गरोदरपणापासुन ते डिलेव्हरी पर्यंत काळजी घेण्यासाठी आवश्यक ते अधिकारी यांची नेमणुक शासनाने केलेली आहे. परंतु सदरची शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही.
सदर महिलेला जुनवणेवाडी ते तळोघ हा रस्ता उपलब्ध नसल्याने सदरचा रस्ता त्वरीत मंजुर करण्यात यावा. तसेच संबंधीत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी. सदर वनिता भाऊ भगत व तिच्या बाळाच्या मृत्युस जबाबदार आरोग्य यंत्रणेचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा येत्या १० दिवसांच्या आत दाखल करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.