नाशिक : मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी एकांताच्या शोधात असलेली अनेक प्रेमीयुगुले दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्ह यांसारख्या परिसरात एकमेकांच्या सहवासात रमताना दिसतात. हाच ट्रेण्ड नाशिकमध्ये फाळके स्मारक, गंगापूरचा बॅक वॉटर परिसर, सोमेश्वर तपोवन परिसरातही पहायला मिळत होता. परंतु, आता हा प्रकार चक्क गोदाघाटसारख्या शहरातील मध्यवर्ती भागात सर्रास घडताना दिसून येत असून, गोदाघाटाचा परिसरही प्रेमीयुगुलांचा अड्डा बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.महापालिकेने भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारलेले फाळके स्मारक नियोजनशून्य कारभारामुळे झाकोळले असले तरी कोट्यवधी रुपये खर्च करून साकारलेला या परिसरात प्रेमीयुगुलांचा वावरही वाढल्याने नागरिकांसह पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागलेली आहे. हाच प्रकार पांडवलेणी, सोमेश्वर, तपोवन, गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रातील विविध परिसरांत दिसून येत आहे.परंतु या भागात कमी वर्दळ असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोर व समाजकंटकांकडून अशा जोडप्यांना त्रास होऊ लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या भागात फिरण्यासाठी जाणाऱ्या जोडप्यांनी आता शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोदाघाटावर अड्डा बनवला असून, गांधी तलावाच्या काठासह, देवमामलेदार पटांगण, भाजी मंडई पटांगण आणि गोदा परिसरात नदीच्या पात्रात बनविण्यात आलेल्या घाटाच्या पायऱ्यांवर बसून खुलेआम अक्षेपार्ह वर्तन करताना ही जोडपी दिसून येतात.विशेष म्हणजे गोदाघाटावर राज्यासह देश-विदेशांतून धार्मिक पर्यटनासाठी अनेक भाविक येतात. त्यांच्यासमोर नाशिकची अशी प्रतिमा निर्माण होणे नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक लौकिकाला धक्का पोहोचविणारी असल्याची प्रतिक्रिया परिसरातील शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे.पायबंद घालण्याची मागणीगोदाघाट हा प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला असून, गांधी तलावाच्या काठासह देवमामलेदार पटांगण, भाजी मंडई पटांगण आणि गोदा परिसरात नदीच्या पात्रात बनविलेल्या घाटावर बसून प्रेमीयुगुल खुलेआम आक्षेपार्ह वर्तन करतात. याला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.
गोदाघाट की प्रेमीयुगुलांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:58 AM