केंद्र सरकारच्या जल मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत नळजोडणीद्वारे शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी गाव कृती आराखडे तयार करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातून गाव कृती आराखडा तयार करणे आवश्यक असून, गावातील सर्व घटकांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.
राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन अंतर्गत तयार करावयाच्या गाव कृती आराखडा पंधरवडा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने सरपंच, ग्रामसेवक, जल सुरक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका, ग्राम पाणीपुरवठा समितीचे दोन सदस्य यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्व १५ तालुक्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार असून, गाव कृती आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. गुरुवारी (दि. २९) रोजी दिंडोरी, इगतपुरी, कळवण, बागलाण, सुरगाणा, पेठ व कळवण या तालुक्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
गाव कृती आराखडा लोकसहभागातून तयार केल्यानंतर व त्याला १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजुरी घेतल्यानंतरच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना व त्याबाबतच्या अंदाजपत्रक याना मंजुरी दिली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली. या प्रशिक्षणात गाव कृती आराखडा महत्त्व व तांत्रिक मार्गदर्शन, निर्मिती प्रक्रिया, पाणी गुणवत्ताविषयक माहिती व नोंदणी, योजना फेरी व प्रश्नावली तसेच सामाजिक अणि संसाधन नकाशे तयार करणे आदी माहिती दिली जात आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे, अभियंता अमोल घुगे, विनोद देसले, संतोष धस, भाग्यश्री बैरागी, सुरेश जाधव, रवींद्र बराथे आदी उपस्थित होते.