सातपूर : सातपूर येथील नॅश कंपनीच्या ग्रुपमधील कामगारांच्या आपापसातील भांडणात सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत सीटू युनियनच्या राज्य कार्यकारिणीने नाशिकला धाव घेतली. या बैठकीत पोलिसांच्य भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दि.२३ रोजी सातपूर येथील नॅश कंपनी ग्रुपच्या सिअर्स कंपनीतील कामगारांच्या आपापसातील भांडणात सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सीटू युनियनचे राज्य सरचिटणीस एम. एच. शेख, डॉ. विवेक मॉन्टेरो, उपाध्यक्ष सईद अहमद, उद्धव भवलकर, सचिव भरमा कांबळे, खजिनदार के. आर. रघू यांच्यासह राज्य कमिटीने नाशिकला धाव घेतली. सीटू भवन येथे घेण्यात आलेल्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, डॉ. कराड यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात आली. दि.६ जून रोजी राज्यस्तरावर आंदोलन छेडणे, तरीही योग्य तो निर्णय न घेतल्यास अन्य ट्रेड युनियनला बरोबर घेऊन देश पातळीवर आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठक घेण्यात आला.
पोलिसांच्या विरोधात आंदोलनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:17 AM