लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला कॉँग्रेस लागली असून, त्याची सुरुवात उत्तर महाराष्टÑापासून करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच उत्तर महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक शुक्रवारी बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवारांची चाचपणी करण्याबरोबरच मित्रपक्षांबाबत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भावनाही जाणून घेण्यात येणार आहेत.
कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचा नाशिकला पहिलाच दौरा होत असून, त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. थोरात यांच्यासह कार्याध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, मुजफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत दिवसभर चालणा-या बैठकांना आजी, माजी आमदार, खासदार, गेल्या निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक सर्व आघाड्यांचे पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून, थोरात यांनी येत्या निवडणुकीत वंचित आघाडी व महाराष्टÑ नवनिर्माण सेनेबरोबर आघाडी करण्याचा मनोदय बोलून दाखविला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्टÑाच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा, शहराच्या पदाधिकाºयांशी स्वतंत्रपणे बोलणी करण्यात येणार असून, याचवेळी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणीदेखील केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षासाठी अनुकूल असलेल्या मतदारसंघाची राजकीय, भौगोलिक व सामाजिक माहिती जाणून घेण्याबरोबरच या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी होती याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या प्राथमिक पातळीवर मुलाखतीदेखील घेण्यात येणार आहेत.