कसबे सुकेणे : महानुभाव पंथाचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिर यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीस ग्रामपंचायतीकडून प्रारंभ झाला आहे. रंगपंचमीला येथील यात्रोत्सव साजरा होतो. यानिमित्त दत्त पालखी सोहळा होतो. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या यात्रेकरू भाविकांना जागा, पाणी, विजेची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतीने काम हाती घेतले आहे. बाणगंगा नदीपात्राची स्वच्छता करून दरवर्षीप्रमाणे रहाटपाळणे, व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच सचिन मोगल यांनी दिली.भाविकांना दत्त महाराजांचे दर्शन सुलभ व्हावे याकरिता दर्शनरांगाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराला रंगरंगोटी करण्यात येत आहे. यात्रा काळात वाढीव बंदोबस्त, वीजपुरवठा याबाबतचे संबधितांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मनोहरशास्री सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर व गोपीराजशास्री यांनी दिली.
बाणगंगा नदीपात्रात यात्रेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. संपूर्ण यात्रा मैदान परिसर स्वच्छ करण्यात येत आहे.- सचिन मोगल, उपसरपंच, मौजे सुकेणे