मंगळवारपासून या मतदार यादीवर हरकत व सूचना नोंदविण्यास प्रारंभ केला असला तरी पहिल्या दिवशी केवळ माहिती घेण्याचे काम काही इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. मात्र दुपारपर्यंत एकही हरकत किंवा सूचना आली नसल्याचे पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी सांगितले. गेल्या निवडणूक कालावधीत असलेल्या ३६ हजार मतदारांपैकी मतदार संघात आता जवळपास ६ हजार १९५ मतदार वाढले आहेत त्यामुळे आता मतदार संख्या ४२,१९५ हजारावर पोहचली आहे. मतदार संघात आता २१ हजार ९७५ पुरुष तर २० हजार २३५ स्त्री व ३ इतर असे एकूण ४२ हजार १९५ मतदार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे असतानाही प्रभागाच्या प्रारुप मतदार यादीत नावे वगळली गेली असल्यास तसेच काही मतदारांच्या नावांची चुकीची छपाई झालेली आहे असे कोणी निदर्शनास आणून दिली तर त्या हरकत, सूचनांची दखल घेतली जाणार आहे. प्रारूप मतदार यादीबाबत प्रभागात राहणाऱ्या नागरिकांच्या हरकत आणि सूचना असल्यास (दि. २३) पर्यंत दखल घेतली जाणार आहे.
इन्फो===
इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
शांता हिरे यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर हिरे यांची कन्या चित्रा भोळे किंवा स्नुषा मोनिका हिरे या दोहोंपैकी एका महिलेला भाजपकडून पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यासाठी तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे संजय कांबळे यांच्या वहिनी निर्मला कांबळे यांनी देखील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करून प्रभागात प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक कविता कर्डक या पुन्हा निवडणूक रिंगणात राहणार असल्या तरी ऐनवेळी जवळच्या कार्यकर्त्याला किंवा पक्ष जो उमेदवार ठरवेल त्याला पाठबळ देण्याची तयारी आहे.