पंचवटी : सुखकर्त्या विघ्नविनाशक गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने पंचवटीतील सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांनी गणेशोत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा केला आहे. गणेशोत्सवात यंदा काय देखावे साकारायाचे याचे नियोजन मंडळाच्या पदाधिकाºयांनी पूर्वीपासून केले असले तरी मंडळासाठी लागणारी देणगी तसेच अन्य वस्तू जमा करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.गणेशोत्सवाला आणखी पंधरवड्याचा कालावधी शिल्लक असला तरी पहिल्या दिवसापासून देखावे सादर करायचा मानस यंदा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्याने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाचे देखावे ज्याठिकाणी साकारायचे त्याठिकाणची जागा निश्चित करून काहींनी मंडप उभारणीचे काम हाती घेतले आहे. तर काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाच्या वर्षाची कार्यकारिणी निवडण्यासाठी बैठका बोलाविल्या आहेत. पंचवटीत बहुतांश मंडळे ही धार्मिक तसेच समाजप्रबोधनपर देखावे साकारत असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित मूर्तिकाराकडे जाऊन मूर्ती व देखावे बुक केले आहेत. काही मंडळांनी देणगी पुस्तके छापून देणगी जमा करण्याचे काम सुरू केले आहे. मोठ्या मंडळांपाठोपाठ लहान मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवासाठी लागणारे मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक, ढोल-ताशे यांना सुपारी ठरवून आगाऊ रक्कम देण्याचे काम केले आहे.