नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दोन जागा रिक्त झाल्या आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपा नगरसेविका सरोज आहिरे यांनीदेखील राजीनामा देऊन राष्टÑवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढविली. दिलीप दातीर यांचा पराभव झाला असला तरी सरोज आहिरे मात्र निवडून आल्या आहेत. यानंतर महापालिकेने दोघांचे नगरसेवकपदाचे राजीनामे राज्य निवडणूक आयोगाला सादर केले होते. आता या प्रस्तावानुसार राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
प्रभागनिहाय मतदारयाद्या १५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, तर प्रारूप मतदारयाद्यांवरील हरकती आणि सूचनांसाठी २२ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. दि.३ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. तर मतदार केंद्रांची यादी ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल आणि १६ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय तसेच मतदान केंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४ आॅक्टोबर रोजी जाहीर केलेली मतदारयादी अंतिम मानण्यात येणार आहे.