वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर : यंदाही शासनाने पायी वारीस मनाई केल्याने संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी शिवशाही बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मात्र, हे प्रस्थान आषाढ शुद्ध दशमीला दि. १९ जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वी परंपरेप्रमाणे पालखीचे प्रस्थान येत्या २४ जून रोजी होणार असून, जयघोष करत मंदिराला प्रदक्षिणा घालत पालखी पुनश्च मंदिरातच ठेवली जाणार आहे. या प्रस्थानाची तयारी संस्थानमार्फत सुरू झाली आहे. दुसरीकडे पावसाच्या आगमनामुळे तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ब्रह्मगिरी हिरवाईने नटला आहे, तर याच ब्रह्मगिरीच्या उत्खननप्रकरणी अजूनही पर्यावरणप्रेमी आवाज उठवताना दिसून येत आहेत.
ज्येष्ठ महिना लागला की, नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांना वेध लागतात ते निवृत्तिनाथ पालखी दिंडी सोहळ्याचे. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून पायी दिंडी सोहळा बंद करण्यात आला आहे. मागच्या वर्षीही शिवशाही बसने पालखीचे प्रस्थान झाले होते. यंदाही शासनाने दिंडीला परवानगी नाकारल्याने दोन बसेसमधून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या बसमधून पालखी सोबत जाण्यासाठी कोणाचा नंबर लागतो, याची प्रतीक्षा आता वारकऱ्यांना लागून आहे. संस्थानमार्फत वारीची तयारी सुरू असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या ब्रह्मगिरी उत्खनन प्रकरणाचाही पर्यावरणप्रेमींकडून पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणात एका तलाठ्यासह कोतवाल निलंबित झालेला आहे. चौकशीची चक्रे वेगाने फिरत आहेत. दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. तत्पूर्वी, वनविभाग व पोलीस प्रशासनाने ब्रह्मगिरीसह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांना बंद केली आहेत. यावर्षी पावसाने मेमध्येच बसण्याची हौस करून घेतली. विशेष म्हणजे मोसमीपूर्व पावसात तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी भात, नागली, वरई आदी खरीप पिकांची पेरणी केली होती. आता ती रोपे मोठी झाल्याने आवणी करण्यायोग्य झाली आहेत. अशाच प्रकारचा दमदार पाऊस तीन-चार दिवस पडला तर भाताची आवणीदेखील पूर्ण होईल. मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील माळरानासह डोंगर-दऱ्या हिरवाईने नटल्या आहेत. गुरांना मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. शहरात वीकेंड लॉकडाऊन असताना पर्यटक आता तालुक्यातील निसर्ग पर्यटनासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. पोलिसांची मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या गर्दीवर नियंत्रण मिळवताना दमछाक होताना दिसून येत आहे.
इन्फो
त्र्यंबकराजाचे मंदिर खुले होणार?
मागच्या वर्षी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत तालुक्यात कोरोनाचा कहर होता. दुसऱ्या लाटेतही तालुका होरपळून निघाला. कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. यात तरुणांचा भरणा अधिक होता. सध्या मात्र त्र्यंबकेश्वर शहर कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात मात्र चारच पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नवीन स्वॅबचे नमुनेदेखील वेटिंगला नाहीत. लवकरच हे रुग्ण बरे होतील. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने हळूहळू निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. शहराचे अर्थकारण हे मंदिरावर अवलंबून आहे. त्यामुळे आता त्र्यंबकराजाचे मंदिर खुले होण्याची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागून आहे.
इन्फो
सावध ऐका, पुढल्या हाका..!
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने पावसाळी नाले, गटारी, गोदापात्र आदी सफाई मोहीम पूर्ण केली असली तरी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कामे झालेली नाहीत. यावर्षीदेखील गावात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यात गोदापात्राची सफाई महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, नगरपरिषदेकडून अद्याप गोदापात्राकडे पूर्णत: लक्ष पुरविण्यात आलेले नाही. पुढचा संभाव्य धोका वेळीच ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे गोदापात्र, नालेसफाई, गटर्स ही कामे समाधानकारक करणे गरजेचे होते.
फोटो- १९ त्र्यंबक-२