सिन्नर : मुंबई येथे बुधवारी (दि. ९) काढण्यात येणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्ह्यातील विविध गावांतून शेकडो वाहने जाणार असून, मंगळवारी सिन्नर तालुक्यातून सुमारे ७० वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली.मुंबईतच्या मराठा क्रांती मोर्चात तालुक्यातून जास्तीत जास्त मराठा समाजबांधव सहभागी व्हावेत यासाठी गेला आठवडाभर जनजागृती रॅली काढण्यात येत होती. गावोगावी बैठका घेऊन मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. जनजागरण रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मंगळवारी दुपारी तालुक्यातील सोनांबे, कोनांबे, ठाणगाव, पाथरे, शहा, सुळेवाडी, बारागावपिंप्री, पंचाळे, मिठसागरे आदिंसह विविध गावांतून सुमारे ७० वाहने मुंबईकडे रवाना झाली. नाशिक जिल्ह्यातून मोर्चाला जाणाºया वाहनांची भायखळा येथील आबासाहेब पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नामदेव कोतवाल यांनी दिली. बुधवारी पहाटे तीनशेहून अधिक वाहने मुंबईकडे मोर्चासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्नर ते मुंबई अंतर इतर जिल्ह्यांच्या मानाने कमी असल्याने बुधवारी पहाटेच शेकडो वाहने मोर्चासाठी रवाना होणार आहेत.
मराठा मोर्चासाठी जिल्ह्यात सज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 11:21 PM