निऱ्हाळे : प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मऱ्हळ येथील खंडेराव महाराजांच्या चारदिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवार (दि. २३) पासून प्रारंभ होणाऱ्या यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडाऱ्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी लावतात.प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या खंडोबा महाराज यात्रेसाठी राज्यभरातील भाविक मिळेल त्या वाहनाने दाखल होत आहेत. जेजुरीस जाण्यापूर्वी मंदिरात नारळ व बेलभंडारा अर्पण करण्याची प्रथा आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता पांगरी येथील मानाचा रथ गावात आल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. ‘जय मल्हार’च्या जयघोषात खोबरे आणि खोबरे-भंडाऱ्याच्या उधळणीत परिसर न्हाऊन निघतो. हातात दिवटी-बुधली घेऊन पुढे चालणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत रथ व खंडेराव महाराजांची पालखी निऱ्हाळे रस्त्यावरील महालबागेत नेण्यात येते. बुधवारी (दि. २४) सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. गुरुवारी (दि. २५) सकाळी महालबागेत तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. दुपारी ३ वाजता होणाऱ्या कुस्त्यांच्या दंगलीत राज्यभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. शुक्रवारी देव घरी आणण्याचा दिवस. या दिवशी दर्शनासाठी भाविकांकडून गर्दी होते. रात्री १० वाजता सर्व ग्रामस्थ हातात दिवटी-बुधली घेऊन ‘येळकोट-येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत खंडेराव महाराज पालखी व मुखवट्याची रथातून मिरवणूक काढतात. (वार्ताहर)
मऱ्हळ यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Published: February 21, 2016 9:53 PM