नाशिकरोड : कोरोनाच्या संसर्गाचे कारण देत खेरवाडी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे खेरवाडीतून बांगलादेशला रेल्वेने केली जाणारी कांदा निर्यात आता नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्का येथून सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मालधक्का येथे ५० ट्रक्समधून रेल्वे वॅगनमध्ये कांदा भरण्याचे काम मंगळवारी दिवसभर सुरू होते. ४२ वॅगनमधून सुमारे १८०० टन कांदा बांगलादेशला जाणार आहे.काही दिवसांपूर्वीच ४२ वॅगनच्या निफाडहून तीन तर लासलगावहून दोन मालगाड्यातून कांदा पाठविण्यात आला. खेरवाडीहून ७ मे रोजी एक मालगाडी कांदा घेऊन रवाना झाली होती. त्यानंतर मात्र कोरोना संसर्गाचे कारण देत खेरवाडी ग्रामस्थांनी विरोध केल्याने खेरवाडी येथून रेल्वेने कांदा निर्यात बंद झाली. कांद्याचे ट्रक हे गावाच्या बाहेरून रमजान ईदमुळे १७ मेपर्यंतच बांगलादेशचे व्यापारी कांदा उचलणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या मालगाडीने कांदा पाठविण्यासाठी निफाड, पिंपळगाव बसवंत, कळवण, वणीहून कांद्याचे सुमारे साठ ट्रक खेरवाडी मालधक्क्यावर आले होते. मात्र ग्रामस्थांनी विरोध केल्याने काम थांबले होते. रमजान ईदनंतर कांदा पोहचला तरी उपयोग होणार नाही, हे लक्षात घेऊन बांगलादेशला निर्यात केला जाणारा कांदा नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथे मंगळवारी आणण्यात आला. ५०हून अधिक ट्रक्समधून आलेला कांदा मंगळवारी नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथून रेल्वे वॅगनमध्ये भरण्याचे काम सुरू होते. मालगाडीच्या ४२ वॅगनमध्ये कांदा भरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ती रेल्वे मालगाडी कांदा घेऊन बांगलादेशला रवाना होईल.
परदेशात कांदा पाठविण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:43 PM