नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह परिसरात गुरुवारी (दि.२३) मध्यरात्री तब्बल चार तास मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे परिसरातील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या तर नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसाने अनेक भागात शेतात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. तब्बल ७३ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या महिन्यापासून संततधार पाऊस सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊसास सुरुवात झाली होती. रात्री अकरा वाजेच्या सुमारास पावसाचा वेग वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरु होता. गावातील गट नंबर ५०७ भागातील खळवाडी परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. सखल भागामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे तेथील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. दमदार पावसामुळे सर्व नद्या, नाल्या, ओढे दुथडी भरुन वाहत होते. डोंगर पायथ्याशी असलेले छोटे- मोठे बंधारे वाहत असल्याने नद्यांना पुर आला आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 2:02 PM