नाशिक : केरळमध्ये मान्सून पाच दिवस अगोदरच येऊन धडकण्याबरोबरच निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मंगळवारी सकाळी काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हलक्या व मध्यमस्वरूपाच्या सरी कोसळल्यामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवला. मात्र दिवसभर ढगाळ वातावरण व हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, यंदा पाऊस समाधानकारक व वेळेवर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला वेग दिला आहे.गेल्या तीन महिन्यांपासून नाशिककर प्रचंड उकाड्याने हैराण झाले असले तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने मार्च महिन्यांपासूनच संचारबंदी व लॉकडाउन लागू केल्यामुळे नागरिक फारसे घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे यंदा उष्माघातासारखे प्रकार टाळण्यास मदत होऊ शकली. परिणामी संपूर्ण उन्हाळाच नागरिकांना घरात बसूनच काढावा लागला. यंदा मात्र हवामान खात्याने मान्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडेल असा अंदाज वर्तविला त्यानंतर मात्र निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण चक्र बदलून टाकले.यंदा मान्सून केरळमध्ये चार-पाच दिवस अगोदरच पोहोचल्याने एकूणच हवामान व वातावरणातील बदल झपाट्याने जाणवला. नाशिक शहर व परिसरात एक जूनपासूनच हवामानात कमालीचा बदल झाला असून, दोन दिवसांपासून ढगाळ हवामान व हवेतील गारवाही वाढला आहे. राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी झोडपून काढल्याचा तो परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, त्याचाच भाग म्हणून मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेपासूनच पुन्हा आकाशात ढगांची गर्दी होऊन काहीसे अंधारलेले वातावरण झाले व हलक्या पावसाला सुरुवात झाली. काही भागांत अर्धातास पावसाची रिपरिप सुरू होती. त्याचवेळी गार हवाही सुटल्याने उकाड्याने हैराण नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला. दिवसभर सूर्यदर्शन न होता. ढगाळ हवामान कायम राहिले.-----------------------चक्रीवादळ जिल्ह्यातून जाणारदरम्यान, महाराष्टÑात बुधवार व गुरुवार असे दोन दिवस निसर्ग चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला असून, नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांतून हे वादळ मार्गस्थ होणार असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवार (दि. ४) रोजी चक्रीवादळ ठाणे जिल्ह्यातून इगतपुरीमार्गे त्र्यंबकेश्वर, हरसूल, कापराडामार्गे वणी, सापुतारा, अभोणा, कळवण, सटाणा, नामपूरमार्गे धुळे जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहे. याकाळात जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.