त्र्यंबकेश्वर : केंद्र सरकारने देशातील प्रमुख तीर्थस्थळांच्या विकासासाठी आठ तीर्थस्थळांना प्रसाद योजना लागू केली आहे. त्यात महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थळाचा समावेश आहे. ४० कोटी रुपये खर्च करून ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या बैठकीत प्रसाद योजना विकास आराखडा ज्येष्ठ आर्किटेक्ट मिलिंद रमाणी यांनी सादर केला. त्र्यंबकेश्वर चौपदरी विस्तारीकरण व स्ंिहस्थाच्या निमित्ताने अनेक विकासकामे झाली. आता प्रसाद योजनेला अर्थसाहाय्य मिळणार आहे. पणजी (गोवा) येथील इफेक्टिव्ह आर्किटेक्चरल सर्व्हिसेस या फर्मकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सीईओ रमाणी यांच्याकडे ही जबाबदारी आहे. बैठकीस खासदार हेमंत गोडसे, पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक संचालक प्रज्ञा बढे, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, समाधान बोडके, देवस्थानचे विश्वस्त सचिंद्र पाचोरकर, ललिता शिंदे, जयंत शिखरे, त्र्यंबकराव गायकवाड, योगेश गोसावी, बाळा सोनवणे, डॉ. बिंदूजी महाराज, दीपक लढ्ढा, गोविंदराव मुळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रसाद योजनेचे सादरीकरण
By admin | Published: October 28, 2016 1:41 AM