लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर करावयाच्या विविध कामांबाबतचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाच्या उच्चाधिकार समितीने सुचविलेल्या सूचनांप्रमाणे तयार करण्यात आला आहे. जवळपास २० कोटी रुपये खर्चाचा हा आराखडा जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत ग्रामविकास विभागास सादर करण्यात आला असून, लवकरच शासनाकडून आराखड्यास मंजुरी मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिली.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नाने व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्याने सप्तशृंगगडास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने जुलै २०१८ मध्ये ब वर्ग तीर्थक्षेत्रांतर्गत मूलभूत कामांसाठीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. आॅक्टोबर २०१८ मध्ये उच्चाधिकार समितीच्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनी सांडपाणी प्रकल्प, शौचालय, दिंडोरीच्या पायºया (शेडसह) या तीन कामांचा प्राधान्याने समावेश करणे तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या दक्षता घेण्यासाठी निधीची तरतूद करणे, मोकळ्या परिसरात वृक्षारोपण करणे, वनविभागाच्या जमिनीबाबत वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन सुधारित आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मूळ आराखड्यात बदल करावयाच्या कामाबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार मूळ आराखड्यात बदल करून एकूण २० कोटी २२ लक्ष ४३ हजार रुपयांचा सुधारित आराखडा तयार करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता.