नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय सहनिबंधक कार्यालयाने राज्य सरकारला सादर केल्याचे वृत्त आहे. तूर्तास जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळामागे सहकार कायदा कलम ८८ नुसार चौकशीचे शुक्लकाष्ट लागले आहे. दरम्यान, भाजपाचा अध्यक्ष करण्यासाठी एकीकडे जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात उलथापालथ सुरू असतानाच या बरखास्तीचा प्रस्ताव शासनाला सादर झाल्याने भाजपाच्या संचालकांनी आता बरखास्ती रोखण्यासाठी भाजपाचा अध्यक्ष करावा, असा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्या कार्यालयाने नाबार्डने केलेल्या आदेशानुसार जिल्हा बॅँकेची नोकरभरतीतील आर्थिक अनियमितता व त्या अनुषंगाने केलेली चौकशी यासह सविस्तर अहवाल तयार करून तो राज्य शासनाला पाठविला आहे. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीचा अहवाल शासनाला सादर केल्याबाबत सहकार खात्यातील सूत्रांनी दुजोरा दिलेला असला तरी हा अहवाल गोपनीय असल्यानेच त्याबाबत कोठे वाच्यता झाली नसल्याचे बोलले जाते. २०१५ मध्ये जिल्हा बॅँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळाची निवडणूक होऊन त्यात २१ संचालक निवडून आले आहेत. अध्यक्षपदी शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांची वर्णी लागली आहे. सुरुवातीला हा कार्यकाळ एक वर्षाचाच असल्याचे संचालकांचे म्हणणे होते. मात्र जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही अध्यक्ष होण्यासाठी पुढे येत नव्हते. आता जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याने भाजपाचे काही संचालक अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र आता बरखास्तीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याच्या वृत्तामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला खो बसण्याची शक्यता आहे.
जिल्हा बॅँक संचालक मंडळ बरखास्तीचा प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:42 AM