पालिका सभागृहात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत ८७ कोटी ४५ लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला होता. त्याला विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता शहरवासीयांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. या सभेस नगराध्यक्ष मोरे यांच्यासह उपाध्यक्षा दीपक पाकळे, नगरसेवक राकेश खैरनार, महेश देवरे, विरोधी गटनेते काका सोनवणे, दिनकर सोनवणे, राहुल पाटील, सुनिता मोरकर, निर्मला भदाणे, दीपक पाकळे, मुन्ना शेख, शमा मन्सुरी, शमीन मुल्ला, पुष्पा सूर्यवंशी, संगीता देवरे, भारती सूर्यवंशी, सोनाली बैताडे, डॉ.विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव यांच्यासह लेखापाल माणिक वानखेडे उपस्थित होते.
इन्फो
पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी
सटाणा शहरातील पुनंद पाणीपुरवठा योजनेकरिता १० कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत यात्रा परिसरात सुशोभीकरण करणे आदीसाठी १ कोटी ५० लाख, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत शहर विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित करणेसाठी ४० लक्ष, बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत नगरपरिषद हद्दीतील माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सूट देणेसाठी अंदाजित २.५ लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
सटाणा नगरपरिषद कार्यालय इमारतीवर सौर प्रकल्प उभारून संपूर्ण कार्यालयाची विद्युत व्यवस्था सौरऊर्जेवर करण्याकरिता २५ लक्ष रुपयांना मंजुरी देण्यात आली. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी विंधन विहिरी घेण्यासाठी १३ लक्ष एवढी तरतूद करण्यात आली आहे.