डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला. ‘पुंडलिके भक्ते रे तारिले विश्वजना। वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरी पाटणा।।’ पंढरपूरच समस्त वारकऱ्यांचे भक्तिपीठ आहे. संत नामदेवराय एका अभंगात म्हणतात, ‘आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।’ अशी नामदेवांची दृढश्रद्धा आहे. परंतु संत ज्ञानदेव - नामदेवांच्या पूर्वीही पंढरपूरच्या यात्रेची परंपरा रूढ असावी. हे जरी सर्वमान्य असले आणि भीमा नदी, पंढरपूर, श्रीविठ्ठलही पूर्वपरंपरेने असले तरी वारकरी सांप्रदायाचा उदयकाल म्हणून आपल्याला बाराव्या शतकाच्या पूर्वार्धच स्वीकारावा लागतो.साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला विशेषत्व प्राप्त झाले. कारण बाराव्या शतकात संत ज्ञानदेवादी भावंडांनी पंढरीचा विशेष महिमा गायिला. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘माझे जीवीची आवडी। पंढरपूर नेईन गुढी।।’ ही ज्ञानदेवांची धारणा होती. संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे शुद्ध होवूनी जावे। दवंडी पिटी भावे चोखामेळा।। टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची ।।’ यातूनच लक्षावधी स्त्री-पुरुषांच्या नि:सत्व जीवनक्रमाला अध्यात्माची जोड देण्यामागील वारकरी सांप्रदायाचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. या महाराष्टÑाच्या मनावर सात्त्विकतेचा, भावभक्तीचा व नि:स्वार्थाचा प्रभावी संस्कार वारकरी संतांनी केला. वारकरी हा सगुण-भक्तीचा पाईक आहे. कारण देवाला भेटायला जाणे आणि देव आपल्यासाठी वाट पाहत उभा आहे, ही मानसिकता विश्वात कुठेही दिसणार नाही. वारी हा वारकºयांचा प्राण आहे. ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।’ हे वारकºयांचे ब्रीद आहे. वारीमधून मानवी जीवनमूल्य जोपासली जातात. अध्यात्माचे, भक्तीचे व आचरणाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. समता-बंधुत्वाची शिकवण मिळते. ‘होय-होय वारकरी । पाहे - पाहे रे पंढरी।।’ ही वारकºयांची ब्रिदावली घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)
पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:58 AM