घोटी : इगतपुरी तालुक्यात कथित आश्रमशाळा भरतीप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांनी समाज कल्याण विभागाच्या वतीने परवानगी नसताना भरतीसाठी मुलाखतीला बोलाविल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्ह्या दाखल करून संस्थेच्या अध्यक्षांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दि. २२ रोजी इगतपुरी न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यभरातून युवक मुलाखतीसाठी इगतपुरी येथे आले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी उच्चस्तरीय तपासणी झाल्याशिवाय भरती होऊ नये व गुन्हा दाखल करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका मांडली होती. रात्री उशिरा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त असल्याचे जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे २८ पदे भरण्यासाठीचे संबंधित संस्थाचालकांनी आखणी केली होती. त्या भरतीबद्दल आज समाज कल्याण विभागाच्या वतीने इगतपुरी पोलीस ठाण्यात प्राप्त कागदपत्रे तपासली असता आश्रमशाळेला मान्यता मिळाली आहे; परंतु कोरोनाकाळामुळे समाज कल्याण विभागाने भरती प्रवेशासाठी परवानगी दिली नव्हती. असे समाज कल्याण विभागाकडून पत्र प्राप्त झाले असल्याचे इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. संस्थाचालकांनी बेकायदेशीर भरतीप्रक्रिया सुरू केली होती म्हणून त्यांना भरतीकरिता येणाऱ्या युवकांची फसवणूक झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, असे पथवे यांनी सांगितले.
----------------.
आवळखेड परिसरात संबंधित आश्रमशाळेची इमारत अस्तित्वात नाही. विद्यार्थी नाहीत मग संस्थाचालकांनी बेरोजगार तरुणांची आर्थिक देवाणघेवाण करून फसवणूक करण्याच्या उद्देशानेच ही भरतीप्रक्रिया, मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. या आश्रमशाळेमागे कुणाचे पाठबळ आहे याची सविस्तर चौकशी व्हायला व्हावी.
- गोरख बोडके, जि. प.चे माजी सदस्य