नाशिक : कॉँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमक्ष एकमेकांचा पाणउतारा करण्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचीच लागण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाली असून, नाशिक जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे पक्षाने विभाजन करून दोन अध्यक्षांचे कार्यक्षेत्र निश्चित केले असताना आता त्यातही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केल्याने वाद निर्माण झाला आहे. राष्टवादी कॉँग्रेसने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र अध्यक्षांची नेमणूक केली असून, दिंडोरीची जबाबदारी अॅड. रवींद्र पगार यांच्याकडे तर नाशिकची जबाबदारी कोंडाजीमामा आव्हाड यांच्यावर आहे. दोन्ही मतदारसंघाचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असताना दिंडोरीचे अध्यक्ष पगार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात हस्तक्षेप केल्याची बाब आव्हाड यांना चांगलीच खुपली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची कामगार आघाडी स्वतंत्र असून, त्यासाठी स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाही इगतपुरीचे उमेश खातळे यांची या सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.आव्हाड यांचा आक्षेपरवींद्र पगार यांची स्वाक्षरी असलेले नियुक्तिपत्र माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते खातळे यांना देण्यात आले. परंतु इगतपुरी तालुका हा नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडत असल्यामुळे खातळे यांची कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यास आव्हाड यांचा आक्षेप आहे.खातळे यांच्या नियुक्तीचा अधिकार कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांना असून, सध्या प्रदेशाध्यक्ष पदच रिक्त आहे. असे असतानाही पगार यांनी थेट आपल्या अखत्यारित ही नियुक्ती कशी केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय अशी नियुक्ती करताना नाशिकचे अध्यक्ष आव्हाड यांना डावलण्यात आल्याची भावना आव्हाड समर्थक व्यक्त करीत आहेत.४पगार यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील सततच्या हस्तक्षेपामुळे आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत लवकरच ते पक्षनेते छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.कामगार सेल जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा प्रश्न माझ्या कार्यक्षेत्राशी निगडित असतानाही मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. माझ्या कार्यक्षेत्रात नियुक्ती करण्याचा अधिकार केवळ मला असताना, दुसऱ्यांकडून होणारा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात काम करावे. - कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्ष, नाशिक लोकसभा मतदारसंघ
राष्टवादीच्या जिल्हाध्यक्षांमध्ये धुसफुस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:32 AM