नाशिकरोड : जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात पाच लाखांच्या नोटांचा छडा पोलिसांनी लावला असून, कामगार दोषी नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नऊ जणांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकारी व कामगारांनी जनरल मॅनेजर सोमेश्वर महापात्रा यांना बुधवारी घेराव घातला. महापात्रा यांनी तातडीने दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या वरिष्ठांशी संवाद साधून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. नोटा गहाळ प्रकरणातील दोषी सुपरवायझरनी कृत्याचा कबुलीजबाब व्यवस्थापनाला लिहून दिला आहे. कामाच्या ताणामुळे चांगल्या नोटा चुकून पंचिंग (बाद) केल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. घाबरल्यामुळे आपण ही बाब लपवून ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनीही आपला अहवाल सादर केला आहे. संबंधित सुपरवायझरना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील निर्दोष नऊ जणांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी कामगार नेते व कामगारांनी महापात्रा यांना घेराव घालून तसे मागणीचे पत्र देण्यात आले. महापात्रांनी दिल्लीतील वरिष्ठांशी बोलणी केली. कारवाई मागे घेण्याच्या प्रोसेसला वेळ लागणार आहे. दरम्यान, निर्दोष कामगारांवरील कारवाई मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया लांबलचक आहे. त्यामुळे कामगारांनी संयम ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी केले. घेराव आंदोलनात मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, जयराम कोठुळे, अशोक जाधव, शिवाजी कदम, रमेश खुळे, राजू जगताप, इरफान शेख, अविनाश देवरूखकर आदींसह कामगार सहभागी झाले होते.
नोटा गहाळप्रकरणी प्रेसच्या व्यवस्थापकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 1:43 AM
जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात पाच लाखांच्या नोटांचा छडा पोलिसांनी लावला असून, कामगार दोषी नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नऊ जणांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकारी व कामगारांनी जनरल मॅनेजर सोमेश्वर महापात्रा यांना बुधवारी घेराव घातला. महापात्रा यांनी तातडीने दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या वरिष्ठांशी संवाद साधून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले
ठळक मुद्देनिलंबनामुळे कामगार संतप्त : कारवाई मागे घेण्याचे आश्वासन