नाशिकरोड : लोकशाहीत कोणी विधायक कामे सुचवली तर सर्व भेद विसरून ती करणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. कारण लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. कोणताही भेद न करता प्रेस कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. आयएसपी-सीएनपी प्रेस कामगारांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल आपला पॅनलतर्फे रविवारी सायंकाळी यूएस जिमखाना स्केटिंग ग्राउंड येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आपला पॅनलचे नेते रामभाऊ जगताप, अशोक गायधनी, जयंत गाडेकर, अरु ण मानभाव, सुरेश बोराडे, बाळासाहेब बोरस्ते, अनिल जाधव, बाळासाहेब कासार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेस मजदूर संघाचे माजी सरचिटणीस व आपला पॅनलचे नेते रामभाऊ जगताप यांनी खासदार चव्हाण यांनी प्रेस कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला असल्याचे सांगितले. प्रेसमध्ये निवडणुका येतील-जातील परंतु दहशत निर्माण करणे, होर्डिंगबाजी करणे हा प्रतिस्पर्धी पॅनलचा एकमेव कार्यक्रम असल्याचा आरोप जगताप यांनी केला. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे, प्रेस कामगार नेते अशोकराव गायधनी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेश बोराडे, सुरेश लवांड, किसन बोराडे, बाबा बोरसे, प्रशांत कापसे, राजाभाऊ पगार, अ़निल जाधव, शशी आवारे, सुभाष खर्जुल, दगू खोले, ज्ञानेश्वर शेळके, राजू भोसले आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना खासदार चव्हाण म्हणाले की, नोटबंदीत प्रेस कामगारांनी जादा कामाचा अधिक मोबदला न घेता रात्रंदिवस काम केले. केंद्र सरकार कामगार हिताची धोरणे राबवत आहेत. प्रेस कामगारांना सातवा वेतन आयोग लागु केल्याने मोदी शासन कामगारविरोधी असल्याचा प्रचार खोटा आहे. सरकार शेतकरी, सामान्य जनता, कामगार अशा सर्वांच्याच हिताचे निर्णय घेत आहे असे चव्हाण यांनी सांगितले.
प्रेस कामगारांचे प्रश्न सोडविणार - चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:00 AM