सुनील शिंदे घोटीराष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घोटी गटात या निवडणुकीत पाचही प्रमुख राजकीय पक्षांनी प्रबळ उमेदवार उभे केल्याने, हा गट राष्ट्रवादीला कायम राखण्याचे कडवे आव्हान उभे राहिले आहे.घोटी गट तसा एक दशकापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. गटातील जिल्हा परिषद सदस्य अलका जाधव यांना अर्थ व बांधकाम सभापती होण्याचा मानही मिळाला आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये या गटात राष्ट्रवादी व शिवसेनेत लढत झाली. यात शिवसेनेला कायम हार पत्करावी लागली. मात्र याही निवडणुकीत पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना तोच परंपरागत उमेदवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरली असल्याचे दिसून येते, तर या गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून, कोणत्याही स्थितीत ही जागा राखायची असा निश्चय मनसेने केल्याने जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी या गटाकडे लक्ष केंद्रित केले आहे तर सुवर्ण व्यापारी असणाऱ्या संदीप शहाणे यांना भाजपाने निवडणूक रिंगणात उतरवून या गटावर आपला दावा सांगितला असल्याने या गटात चौरंगी लढत होणार हे मात्र निश्चित झाले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने मात्र केवळ अस्तित्वासाठी उमेदवार दिला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या गटाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील पाच गटांपैकी राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचा समजला जाणारा घोटी या एकमेव गटात इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने या गटातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र चार जणांनी या गटातून माघार घेतल्याने या गटातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, शिवसेनेकडून निवृत्ती जाधव, मनसेकडून संदीप किर्वे, भाजपाकडून संदीप शहाणे तर काँग्रेसकडून भास्कर गुंजाळ यांच्यात लढत होत असली तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेतच होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.