नाशिक : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी अतिशय काटेकोर नियोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात वाढविण्यात येत असलेले १५० बेड आणि मनपाच्या वतीने १०० बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालयात बेडचे नियोजन मोलाचे ठरू शकणार आहे.
सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारावेत, आवश्यक औषधांचा साठा राहील याची काळजी घ्यावी, रक्त, प्लाझ्माचीही सोय ठेवावी यासह अन्य बाबींचे निर्देश राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. केवळ घोषणा नव्हे, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा स्पष्ट सूचनादेखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. मे महिन्याच्या प्रारंभापासून लावलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात स्थिरावली असली तरी यापुढे अत्यंत सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागणार आहे, तसेच तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे; पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर लसींचा पुरवठा आवश्यक असून, लसीकरण अधिकाधिक वेगाने करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे यावर अवलंबून आहे की आपण सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कसे करतो. वैयक्तिक पातळीवर, स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर आणि सर्वत्र, आपण खबरदारी घेतल्यास आणि मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केल्यास आपण कोरोनाची तिसरी लाट येण्यापासून रोखू शकता.
ज्यांनी लस घेतली आहे, मास्क घातले आहेत, पूर्ण खबरदारी घेतलेले लोक सुरक्षित आहेत; परंतु विषाणूला नवीन संधी दिली तर केसेसदेखील वाढतील. जे आधी सावध होते; परंतु नंतर निष्काळजी झाले, अशा वेळी प्रकरणे वाढतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसारच लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि त्यांच्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि लहान मुलांमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे, तसेच दुर्दैवाने लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला, तर आपली पूर्णपणे तयारी असावी. या दृष्टिकोनातून नाशिक मनपाच्या वतीने १०० बालकांसाठीच्या विशेष रुग्णालयाच्या तयारीलाही वेग देण्यात आला आहे.
ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ
मार्च आणि एप्रिल महिन्यात शहरात ऑक्सिजनचा पुरवठा केवळ ७० मेट्रिक टनपुरताच मर्यादित होता. मात्र, सध्या सर्व ऑक्सिजन प्रकल्प आणि पुरवठादारांच्या माध्यमातून १०० मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्यात मे महिन्याच्या प्रारंभापासून काही प्रमाणात घट आली आहे.
मिळू लागले ऑक्सिजन बेड
शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. सर्वाधिक मुख्य समस्या ही ऑक्सिजन बेडला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठ्याची होती. मात्र, ती समस्या ऑक्सिजनच्या वाढत्या पुरवठ्याने मार्गी लागल्यामुळे नागरिकांना ऑक्सिजन बेडदेखील उपलब्ध होऊ लागले आहेत.
कोविड केअर सेंटर समाधानकारक
महानगरातील मोठ्या कोविड केअर सेंटरची संख्या चौदावर पोहोचली असून, सर्व कोविड केअर सेंटरमधून नागरिकांना समाधानकारक सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे कमी प्रमाणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर उपकारक ठरली आहे.
औषधींची समस्या कायम
शहरासह जिल्ह्यात कोरोना काळात आवश्यक मानल्या गेलेल्या रेमडेसिविर, टोसिलीझुमॅब, तसेच काही अन्य औषधांची कमतरता गत तीन महिन्यांपासून कायम आहे. त्यामुळे या औषधींचा पुरेसा पुरवठा सुरळीत होण्यासह भविष्यासाठी त्यांचा मुबलक साठा करून ठेवण्याची आवश्यकता आहे.
----------
(ही डमी आहे. )