वटार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात चालू असून, जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला वेग चढत गेला व आज अंतिम दिवशी कार्यकर्ते अगदी शेतात, घरी, रस्त्यावर, कुठे दिसेल तिथे मतदारराजाची भेट घेऊन प्रचार करताना दिसत होता. प्रचाराच्या अंतिम दिवशी कार्यकर्ते आपला उमेदवार कसा चांगला आहे ते पटवून देत होता, त्यामुळे उमेदवार कार्यकर्ते तहान, भूक विसरून कामाला लागले आहेत. मोठेमोठे साउंड लावून आपल्या पक्षाची वेगवेगळी गाणी तयार करून प्रचार केला गेला. तसेच ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आपल्या उमेदवारांसाठी गावोगावी सभा घेताना दिसले तसेच प्रत्येकाच्या घरी जाऊन, अगदी शेतात, रस्त्यावर, लग्नसमारंभ, वाढदिवस अशा ठिकाणी जेथे वेळ मिळेल तिथे मतदारांची भेट घेऊन आपापला प्रचार केला व आपल्या पक्षाने केलेल्या विकासकामांची माहिती लोकांना पटवून दिली तर काही ठिकाणी आश्वासने दिली. गावातील चौकाचौकात, शेतात राबतानासुद्धा याच गोष्टींची चर्चा होत होती. तसेच एकमेकांचा अंदाज घेऊन अमुक उमेदवाराने गावासाठी खूप मेहनत घेतली, चांगली विकासकामे केली, त्यामुळे हाच उमेदवार निवडून येणार, असे खात्रीशीरपणे सांगत होते तर अमुक पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानंतर पाच वर्ष गावाकडे फिरूनदेखील पाहणार नाही अशा चर्चा करून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. तसेच वैयक्तिक व काही सामाजिक लोकांच्या अडचणी जाणीवपूर्वक सोडविलेल्या नसल्याने यावरही मतदारराजा अडून बसलेला आहे. ज्यांनी आतपर्यंत केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली, त्यांना मतदारांची समजूत घालता घालता उमेदवारांच्या नाकीनव आणले जात होते. काही उमेदवार ओल्या पार्टीवर भर देऊन मतदारांना खुश करण्यचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे निव्वळ मोकार असलेल्या तळीरामांना तर गेले दहा-पंधरा दिवस तर आयतीच संधी चालून आल्यामुळे दोन्ही बाजूच्या पार्टीवर ताव मारताना ते दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटी शेवटी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला असून, उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होताना दिसत आहे. उमेदवार शेताच्या बांधेबांध फिरून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत कमी वेळ असल्यामुळे शेताच्या बांधावर फिरून मते मागण्यासाठी, जिथे मतदारराजा दिसेल तिथे जाऊन त्याच्या पाया पडून मते मागताना दिसून येत होते़
जिल्ह्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By admin | Published: February 19, 2017 11:38 PM