नाशिक : गेल्या वर्षभरात उत्पानदन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, नवीन आर्थिक वर्षात चारचाकी व दुचाकी वाहनांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चारचाकी वाहनांची किंमत एक ते दीड टक्क्यांनी वाढण्याचा अंदाच विक्रेत्यांनी व्यक्त केला असून, दुचाली वाहनांच्या किंमतीत चार ते पाच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वाहन विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
नवीन दुचाकी न चारचाकी वाहनांंच्या किमतीत सप्टेंबर, २०१८ नंतर या वर्षी अशा प्रकारे एकाच वेळी मोठी भाववाढ होत असल्याची माहिती वाहन बाजार अभ्यासकांनी दिली आहे. २०१८ मध्ये नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्यांना पाच वर्षांचा विमा बंधनकारक करण्यात आला होता. यात एक वर्षाचा पूर्ण व उर्वरित चार वर्षांचा थर्डपार्टी इन्शुरन्स काढणे अनिवार्य करण्यात आले होते, तर चारचाकी वाहनांना तीन वर्षांचा इन्शुरन्स अनिवार्य करण्यात आला होता. त्यामुळे वाहनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर, आता उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे विविध वाहन उत्पादन कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत वाहन बाजार अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
कोट-
अद्याप अधिकृतरीत्या कोणत्याही वाहनांच्या किमतवाढीची माहिती उपलब्ध झालेली नाही. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि चारचाकी वाहनांना वाढती मागणी, यामुळे नवीन आर्थिक वर्षात प्रमुख चारचाकी वाहन उत्पादक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
प्रीतेश शाह, संचालक जितेंद्र व्हील्स
कोट-
दुचाकी वाहन उत्पादनात सुमारे अडीच ते तीन हजारांची वाढ झाली आहे. परिणामी, वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता असून, या किंमतवाढीचा परिवहन कर, विमा या बाबींवरही परिमाण होणार असल्याने, मध्यम श्रेणीतील वाहनांच्या किमती तीन ते चार हजारांनी वाढण्याची शक्यता आहे.
प्रकाश खैरनार, वाहन विक्री व्यपस्थापक