गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे शेतकरी आधीच त्रस्त झाला आहे. त्यात कोरोनामुळे पिकलेल्या मालाला भाव नसल्याने नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट तसेच अवकाळी वातावरण अशा अनेक आर्थिक नुकसानीत शेतकरी जगत आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यंदा खरीप हंगामात रासायनिक खतांची भाववाढ होईल की नाही स्पष्ट चित्र नव्हते. मात्र, अचानक दोन दिवसांत सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ करण्याचा निर्णय झाल्याने विशेषतः शेतकऱ्यांमध्ये तसेच केंद्रसंचालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. प्रतिबॅग १०० पासून ते ७०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरात खते देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
कोट...
रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे शेतकरीवर्ग व कृषी सेवा केंद्र खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. तसेच आम्ही सर्व कृषी सेवा केंद्र संचालक संभ्रमात आहोत. तरी केंद्र सरकारने यावर निर्णय घेऊन लवकर शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा.
सोमनाथ अहिरे, संचालक, गंगापुत्र कृषिसेवा केंद्र, वडेल,
कोट...
शेतकरी आधीच कोरोना, अवकाळी पाऊस, मालाला भाव तसेच त्यात मार्केट बंदमुळे पैसे उपलब्ध नाहीत. आगामी खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची भाववाढ यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
- विशाल व्ह्याळीज, शेतकरी, कुकाणे
I