नाशिक : वार्षिक भाडेमूल्यातील वाढ आणि मोकळ्या भूखंडांवरील कराच्या दरातील वाढीचा विषय मिटत नसताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाण्याच्या हिशेब बाह्य वापराचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने दैनंदिन पाणी वापराची किमान मर्यादा वाढविताना त्यानुसार किमान देयकाचे दर निश्चित केले असून, त्यामुळे बंद मीटरच्या देयकांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष वाढ केली आहे. शहरात चार लाखांहून अधिक मिळकती असल्या तरी १ लाख ९१ हजार पाणी मीटर आहेत. त्यातील ७० टक्के मीटर बंद असल्याचा धक्कादायक निष्कर्ष मनपाने नियुक्त केलेल्या कंपनीने काढला आहे. म्हणजे सुमारे १ लाख ३३ हजार बंद मीटरधारकांना या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासंदर्भातील आदेश निर्गमित होताच पालिकेच्या वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या करवाढीच्या विषयावरून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वादाचा धुराळा बसत नाही तोच पालिकेत या नव्या वादाला सुरुवात झाली असून, त्यामुळे महापालिकेचे वातावरण तप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे लेखापरीक्षण व ऊर्जा लेखा परीक्षण मे. एन. जे. एस इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. यांच्याकडून करून घेतले आहे. या कंपनीने सादर केलेल्या तांत्रिक अहवालानुसार पाण्याचा हिशेब बाह्य वापर हा ४३.०८ टक्के इतका आहे.तसेच पाणी लेखापरीक्षण करताना या कंपनीने शहरात २० टक्के पाण्याच्या मीटर कनेक्शनची तपासणी करून प्रत्यक्ष नळाच्या आकारानुसार पाणी मोजणी केली आहे. या सर्वेक्षणानुसार सादर केलेल्या अहवालात सुमारे ७० टक्के मीटर नादुरुस्त अथवा मीटर बंद अथवा मीटर शिफ्ट केलेले आढळले आहे. इतकेच नव्हे तर मीटरदेखील जागेवर नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नळ जोडणीधारकांना तसेच ग्राहकांना सरासरी बिले दिली जातात. त्याच्या दरात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुधारणा केली आहे. यापूर्वीच्या निकषात कमीत कमी वापराचे परिमाण सद्यस्थितीत आढळलेल्या सरासरी वापराच्या परिमाणापेक्षा कमी आढळून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाणी वापर व देयकांद्वारे केलेली मागणी यात मोठी तफावत दिसून येत असल्याने सुधारित परिमाण केल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरगुती, बिगर घरगुती आणि व्यावसायिक पाण्याच्या किमान वापरात वाढ गृहीत धरली आहे. दरात कोणतेही बदल केले नसले तरी किमान वापर वाढल्याने किमान देयकातही वाढ केली आहे. किमान देयक किंवा मोजमापापेक्षा जास्त येणारे बिल यानुसार आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे मीटर बंद असले तरी त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.* याच पद्धतीने पाऊण इंची नळ जोडणीसाठी ३४ किलोलिटर पाण्यासाठी १७० रुपयांचे किमान बिल असताना त्यात बदल करून ५५ किलोलिटर पाणी किमान व दर महिना २७५ रुपये याप्रमाणे असतील.* एक इंची जोडणी असल्यास ६८ किलोलिटर पाण्याचा वापर केल्यास पूर्वी ३४० रुपये दर होते आता मात्र त्यात १२० किलोलिटर किमान दर पकडून ६०० रुपये प्रति महिना किमान देयक असेल.* अशाच प्रकारे दीड इंची व्यासाची नळ जोडणी असेल तर किमान वापर १३६ किलोलिटर व देयक ६८० ऐवजी किमान वापर ३५० व किमान देयक १७५० रुपये मासिक या दराने देयक देण्यात आले आहे.* त्याचप्रमाणे दोन इंची, तीन इंची अशा सर्वच व्यासाच्या जोडणीत वाढ करण्यात आली आहे. तर सर्वाधिक १२ इंच व्यासाच्या नळ जोडणीसाठी पूर्वी ११२० किलोलिटर किमान वापर व ५६०० रुपये किमान देयक अपेक्षित होते. त्यात ४० हजार ५०० असा किमान वापर तर २ लाख २ हजार ५०० रुपये किमान देयक निश्चित करण्यात आले आहे.व्यावसायिक वापरात वाढ* व्यावसायिक दरवाढीत अर्धा इंच व्यासाच्या जोडणीसाठी पूर्वी १७ किलोलिटरसाठी ४६० रुपये किमान दर होते. तर आता २५ किलोलिटरसाठी किमान दर ६७५ रुपये इतके असतील तर याच व्यावसायिक वापरात १२ इंची व्यासाच्या नळजोडणीसाठी ११४८ लिटर्स किमान वापर तसेच ३१ हजार रुपये किमान देयके असणार आहे. आता त्यात ४० हजार ५०० लिटर्स किमान वापर आणि २ लाख ९३ हजार ५०० रुपये असे देयक असणार आहे.बिगर घरगुतीसाठी किमान बिल ६६०० रुपयेबिगर घरगुतीसाठी अर्धा इंच जोडणीसाठी किमान १७ किलोलिटर वापर आणि किमान ३७५ रुपये दर आहे. त्यात वाढ केल्यानंतर आता २५ किलोलिटर किमान वापर आणि ६६० रुपये किमान दर असेल तर सर्वाधिक १२ इंच नळ जोडणीसाठी १ हजार किलोलिटर वापर किमान गृहीत व २२ हजार रुपये किमान देयक होते. त्यात बदल करून आता ४० हजार ५०० किमान वापर करण्यात आला असून ८ लाख ९१ हजार रुपये किमान देयक असेल.पाण्याचा किमान वापर आणि त्यासाठी किमान दर काय असावेत हा धोरणात्मक निर्णयाचा भाग आहे. त्यामुळे महासभेवर त्याबाबत धोरण ठरले पाहिजे.- गुरुमित बग्गा, गटनेताकिमान दीडशे तर कमाल दोन लाख रुपयेसामान्यत: नागरिकांकडे अर्धा इंच व्यासाची नळ जोडणी असते. त्याला किमान दोन हजार लिटर मासिक वापराची मर्यादा होती व मीटर बंद किंवा नादुरुस्त असेल तर किमान शंभर रुपये मासिक देयक बंधनकारक होते; मात्र आयुक्तांनी वाढ करून तीन हजार लिटर पाण्याचा किमान वापर गृहीत धरला आहे; परंतु त्याचबरोबर पूर्वी शंभर रुपयांऐवजी किमान असलेले दर वाढवून ते दीडशे रुपये केले आहे.
बंद मीटरच्या देयकांच्या माध्यमातून आता पाणीपट्टीत छुपी दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:09 AM