अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात शनिवारी (दि.१३) ३७२ ट्रॅक्टर्सद्वारे ९०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्यास कमाल ११७० रुपये, किमान ४०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला.उन्हाळ कांदा बाजारात येण्याच्या वेळेसच देशात लॉकडाऊन झाले. या कालावधीत वाहतूक बंद झाली होती. हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स बंद असल्याने कांद्याची मागणी घटली होती.परिणामी कांदा दोनशे रुपयांपासून ६०० रूपये प्रतिक्विंटल दराने विक्री होऊ लागला. त्यामुळे कांदा उत्पादक संतप्त झाले होते. आता देशभरात व्यवहार सुरू होऊ लागल्याने कांद्याची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी येथील उपबाजारआवारात कांदा ९०० ते ११७० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्या काही प्रमाणात उघडल्या असल्या तरी मालविक्रीसाठी शेतकऱ्यांची फारशी गर्दी होत नाही. त्यामुळे आवक घटल्याचे दिसून येत आहे.---------------------------जुलैपर्यंत दर टिकून राहण्याची अपेक्षाकांदा दर जुलै मध्यापर्यंत स्थिर राहण्याचा अंदाज आहे, कारण जुलै मध्यानंतरच कर्नाटक, तामिळनाडू या भागातील कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते, तोपर्यंत दर टिकून राहतील. तर यंदा निसर्ग चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातील कांद्याचे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आपल्याकडील कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता कांदा व्यापारी मनोहर पवार यांनी वर्तविली आहे.
अभोण्यात कांद्याला ११७0 रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:14 PM