नाशिक : देशासह राज्यातील विविध भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याच्या किमती वाढल्या असून, तूर, मूग, उडीद आदि डाळींच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. राज्यातील अत्यल्प पावसामुळे डाळींच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्वच डाळींच्या किमती प्रतिकिलो दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. देशांतर्गत उत्पादनात झालेली घट व विदेशातून आयात डाळींना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद यामुळे देशात उत्पादित डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. तूरडाळ १३५ ते १४० रु पये किलोने मिळत आहे. उडीद १७०, हरभरा ८० ते ८५ , मूग १०० रु पये प्रतिकिलो असे सध्याचे दर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत डाळींच्या बाजारभावात जवळपास दुप्पट दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात हरभराडाळीचे भाव प्रतिकिलो ६०, उडीद ७८, मूगडाळ ७५ रुपये होते. सर्व डाळींच्या दरांमध्ये प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी दरवाढ झाली असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीमुळे डाळींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डाळींसोबतच बाजरी, तांदूळ, साखर, शेंगदाणे, खाद्यतेल, कांदा आदि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली असून, साखरीच्या किमतीतही १० रुपये वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
डाळींच्या किमती कडाडल्या
By admin | Published: May 30, 2016 10:10 PM