नाशिक : राज्याचे कृषिमंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असून काल नाशिकच्या बाजार समितीत अवघड दोन ते तीन रुपये किलो या दराने टोमॅटो विकला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिला, त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आज सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या दरम्यान सरकारकडून किमान भाव आणि अनुदान मिळावे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काल, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणलेल्या टोमॅटो मालाला मातीमोल बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल टोमॅटो बाजार समितीत जनावरांना सोडून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी पेठरोड येथील शरदचंद्र पवार बाजार समितीत टोमॅटो बाजारात भेट देऊन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान बाजारभाव मिळावा तसेच वाहतूक अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.