बाजारात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला. त्यामुळे दिवसेंदिवस दरात घसरण होत गेल्याने शेतकऱ्याच्या हातात काहीही लागले नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक व महिलावर्गामध्ये भाव कमी झाल्याने आनंद निर्माण झाला, तर जगाचा पोशिंदा बळीराजांच्या डोळ्यात मात्र अश्रू आले. सध्या शेतात भाजीपाला पिकाला चांगला बहर येत असताना, अचानक वातावरणात बदल निर्माण झाल्याने भाजीपाला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. महागडी औषधे खरेदी करून शेतकरी वर्गाने मोठ्या मेहनतीने भाजीपाला वाचविला, परंतु पिकाला भाव न मिळाल्याने बळीराजाची मेहनत वाया गेली. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या बदलामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी जास्त होत राहिल्याने अगोदरचा कालखंड जर सोडला, तर शेवटपर्यंत भाजीपाल्याला हमी भाव मिळाला नाही. परिणामी, काही भाजीपाला बाजारातच फेकून द्यावा लागला. त्यात मजुरी, गाडीभाडेही फिटले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातही शेतकरी वर्ग अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे.
दिंडोरी तालुक्यात भाजीपाल्याला कवडीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 6:16 PM