सिन्नर : श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. श्रीक्षेत्र जाळीचा देव (जयदेव वाडी, ता. भोकरदन, जिल्हा जालना) येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे ८०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. येथे दांडी पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेसाठी राज्यातून सुमारे ३० ते ४० हजार भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. ही यात्रा आठ दिवस भरत असून, यात्रेत मोठ्या प्रमाणात संत, महंत तथा सदभ्नत उपस्थित असतात. जाळीचा देव येथे महानुभाव पंथाचे आश्रम असून, श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे दोन हजार ग्रामस्थ वास्तव्य करत आहेत. परिसरातील गावे टिटवी, नांदा तांडा, देवारी, देऊळगाव गुजरी, धामगाव बढे, मढ, वाढोना, विदुरा वाल संगवी, पडली, सावळीदरबार येथील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा नसल्याने तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना जावे लागते. हे अंतर लांब असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही व आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. श्रीक्षेत्र जाळीचा देव परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता असल्याचे गोसावी यांनी भारती पवार यांना साकडे घातले. पवार यांनी निवेदन स्वीकारून श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा उपलब्ध करू, असे आश्वासन दिले. यावेळी यतीन कदम, सचिन हाडपे, सार्थक गोसावी, अजित शेख आदी उपस्थित होते.
--------------
फोटो ओळी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना निवेदन देताना तालुका भाजपचे उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी. (२४ सिन्नर २)
240821\24nsk_21_24082021_13.jpg
२४ सिन्नर २