ओझर : विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।... या ओळी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून क्र ांती घडवली आणि मुलींना शिक्षणाची कवाडे खुली झाली . मती, नीती आणि गती या तीनही बाबींचा विचार केल्यास ओझर मधील त्याच मुलींच्या शाळेत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.आधीपासून साडेसातीने ग्रासलेल्या ओझरच्या बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागलेले ग्रहण सुटत नसताना आता त्याला नेहेमीप्रमाणे लॉकडाऊनमध्ये सुद्धा मद्यपी,जुगारी आणि प्रेमीयुगुलानी बेजार करून ठेवले आहे.ओझर गावात दोन जिल्हा परिषद शाळा आहे. महामार्ग पलीकडे मुलांची तर बाजारपेठेत मुलींची. सध्या महामार्गावरील शाळेचे निर्लेखन झाल्याने तेथील विद्यार्थी गावातचदोन सत्रांमध्ये कसेबसे शिक्षण घेतात.या शाळेच्या आवाराची खासियत म्हणजे चारही बाजूनेआत शिरता येते. दोन्ही सत्रांचीशाळा सुटली की सुरवातीच्या इमारतीत सुरू होते ती दारु ड्यांची मेजवानी. पडलेला बाटल्यांचा खच,त्यात फुटलेल्या काचेच्या बाटल्या मच्छरांचे साम्राज्य, कुबट वास हे सर्व पाहता शाळा रोगाच्या खाईत लोटली जात आहे. समोरच्या दुमजली इमारतीत दिवसा जुगाराचे अड्डे चालते तेथे देखील सिगारेटची थोटकं व बाटल्या सर्रासपणे उघड्यावर फेकलेल्या आहेत. तेच ठिकाण सायंकाळी प्रेमीयुगुलांना मिटिंग पॉर्इंट बनून गेला आहे. काही वर्गांचे कोंडे तोडण्याचा प्रयत्न झाला आहे.मागच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूने येऊन प्रेमवीर थेट शिडीच्या सहाय्याने वर जातात.एकूणच या प्रकरणी शाळेला संरक्षण भिंतच नसल्याने हे सर्व प्रकार घडत असून आसपास मोठी नागरीवस्ती आहे.पोलिस व स्थानिक प्रशासनाने देखील गस्त वाढवून सदर प्रकरणी विद्येच्या संकुलाचे होणारे नुकसान थांबवावे असे आवाहन पालकांनी व्यक्त केले आहे.---------------------------------------आज ज्या प्राथमिक शाळेत भारताची भावी पिढी विद्येचे धडे गिरवते तेथे चालणारे हे अघोरी प्रयोग निंदनिय आहे.शाळेच्या वर्गखोल्या प्रेमीयुगुलांचे हक्काचे ठिकाण बनले असून मद्यपी व जुगार खेळणार्यांमुळे परिसराला पूर्णपणे घाणीने ग्रासले आहे.स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.-पांडुरंग आहेर,अध्यक्ष, शालेय समिती.