पंचवटी : गेल्या महिन्यात श्रावणात पेठरोडला कैलास मठात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी रुद्राभिषेक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या दौऱ्याला पंधरवड्याचा अवधी लोटत नाही तोच गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मोदी यांनी पुन्हा पूर्णाहुती सोहळ्याला हजेरी लावली. दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या मोदींच्या भावाबरोबर साधू महंतांनी फोटो सेशन केले. मात्र दौऱ्याबाबत पुन्हा कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मोदींचे भाऊ पंकज मोदी सलग दुसऱ्यांदा कैलास मठात आले असले तरी याबाबत स्थानिक पोलीस, भाजप नेते, पदाधिकारी हे सर्वच अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंकज मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा कैलास मठात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली असली तरी त्यांच्या या दौऱ्यामुळे कैलासमठ व साधू महंत पुन्हा चर्चेत आले आहे. कैलास मठात विविध धार्मिक तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबविल्याबद्दल विरक्त साधू समाज मंडळातर्फे कैलास मठाचे महंत संविदानंद सरस्वती यांचा महंत भक्तीचरणदास यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी पंकज मोदी, आदिंसह साधू महंत उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या भावाची पुन्हा ‘कैलासमठ' वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:12 AM