नाशिकरोड : आधारकार्ड दिवसागणिक महत्त्वाचे ठरत असताना बेकायदेशीररीत्या आधार कार्ड करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मान्यता नसलेल्या जेलरोड येथील आधार कार्ड केंद्रावर बुधवारी उपजिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकून मशीन जप्त करण्यात आले. याबाबत सायंकाळपर्यंत पोलिसात मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता.जेलरोड येथे विशाल गडलिंग यांचे नेटवर्क पीपल्स सर्व्हिसेस येथे खासगी (नॉनस्टेट रजिस्टर) मशीनद्वारे आधार कार्ड नोंदणीचे काम सुरू होते. तथापि, या केंद्रावर आधार नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये घेत असल्याची तक्रार उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने तक्रारीची तत्काळ दखल घेत याबाबत ई डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मॅनेजर चेतन सोनजे यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोनजे यांनी या केंद्रावर जाऊन तक्रारीची शहानिशा केली असता तक्रारीत तथ्य आढळले. त्यामुळे सोनजे यांनी ही बाब नितीनकुमार मुंडावरे यांना कळविली. (पान ७ वर)त्यानंतर मुंडावरे यांनी आधार नोेंदणी संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित आधार मशीन जप्त करण्याचे आदेश दिले होते. तसेच यासंदर्भात संचालक, माहिती व तंत्रज्ञान यांच्या कार्यालयातील समन्वयकांना या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच अशाप्रकारे आधार नोंदणीसाठी कोणी पैशाची मागणी करीत असल्याचे त्याबाबत तत्काळ तक्रारी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी केले आहे.नाशिकमध्ये यापूर्वी बनावट रेशन कार्ड आणि मतदार कार्ड बनविण्याचे प्रकार घडत असल्याचे आढळले होते त्यातून काही राजकिय व्यक्तींवर कारवाईही झाली आहे. परंतु आता मात्र आधारकार्डाचीही बनवेगिरी सुरू झाल्याचे आढळले असल्याने आधारकार्ड काढताना सावध राहावे लागणार आहे.(प्रतिनिधी)
बोगस आधार कार्ड केंद्रावर छापा
By admin | Published: February 11, 2016 12:10 AM