मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा सहकारी कारखान्याच्या मध्यवर्ती कार्यालयीन इमारतीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आडोशाला तीनपत्ती जुगार खेळणाऱ्या आठ जणांना छावणी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून १३ हजार ७६० रूपयांची रोकड, दुचाकी, भ्रमणध्वनी संच असा एकूण एक लाख ९५ हजार ८६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज बुधवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पी. पी. वाडिले यांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कोलते, पोलीस नाईक अविनाश राठोड, शांतीलाल जगताप, पोलीस कर्मचारी पंकज भोये, नरेंद्र कोळी, नितीन बारहाते, हेमंत तांबडे, संजय पाटील, संदीप राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पंचांना समवेत घेवून पोलीस पथकाने दाभाडी कारखान्याच्या आवारात छापा टाकला. कारखान्याच्या काही अंतरावर शासकीय वाहन उभे केले. यावेळी तीनपत्ती जुगार खेळताना दिनेश केदा थोरात (३२) रा. गिसाका, दाभाडी, विलास पुंडलिक जाधव (४४), श्रीकांत जामराव निकम (३८), योगेश कैलास निकम (४१), प्रशांत नामदेव सोनवणे (३६), अमोल दिलीप निकम (३५), संजय गोरख गिरासे (३६) व प्रमोद बन्सीलाल मानकर (४०) सर्व रा. गिसाका, दाभाडी या आठ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून १३ हजार ७६० रूपयांची रोकड, पत्त्यांचा कॅट, आठ भ्रमणध्वनी संच, सात दुचाकी असा एकूण एक लाख ९५ हजार ८६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छावणी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक संदीप राठोड यांनी फिर्याद दिली.
दाभाडीच्या गिसाका आवारात जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:58 AM