नाशिक : अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडले असून, आता तूरडाळ वाटपासाठी ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ देण्याची पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्यांना रेशनमधून तूरडाळ मिळणार नाही, त्यांचा रोष रेशन दुकानदारांना सोसावा लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी आधारभूत किमतीत खरेदी केलेली तूरडाळ यंदा रेशनमधून ५५ रुपये किलोप्रमाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यांना तूरडाळीचा कोटाही मंजूर करण्यात आला असून, पंधरा दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने नाशिक जिल्ह्यासाठी ४२९५ क्विंटल तूरडाळ देण्यास मान्यता दिली. जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या सव्वा सात लाखांच्या आसपास असून, पुरवठा खात्याने मंजूर केलेली तूरडाळीचे शिधापत्रिकेशी तुलनात्मक प्रमाण पाहता, साधारणत: ५६ टक्के इतकाच पुरवठा झाला आहे त्यामुळे एका शिधापत्रिकाधारकास अर्धा किलो वा ५६० ग्रॅम तूरडाळ देण्याचे नियोजन पुरवठा खात्याने केले होते. परंतु मार्केट फेडरेशनने तूरडाळीचे प्रत्येकी एक किलो वजनाचे पॅकबंद पाकिट करून देण्याच्या शासनाच्या सूचना असल्यामुळे प्राप्त होणारी तूरडाळ खुली करून विक्री करणे शक्य नसल्याने पुरवठा खाते पेचात सापडले आहे. त्यावर उपाय म्हणून आता तालुक्यांना वाटप करण्यात आलेली तूरडाळ प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यातही प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. तूरडाळ घेण्यास जो अगोदर येईल त्यालाच रेशन दुकानदार विक्री करेल, तूरडाळ संपल्यावर जो शिधापत्रिकाधारक येईल त्याला मात्र ती मिळणार नाही. अशा वेळी रेशन दुकानदाराशी खटके उडण्याचा संभव अधिक आहे. त्यामुळे शासनाने शिधापत्रिका धारकांच्या प्रमाणात तूरडाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळीची कमतरता दुकानदारांचे प्रथम येणाºयास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:20 AM