नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून शेतीकामासाठी कारागृहाच्या पाठीमागील मोठा बगीचा येथे कामाकरिता नेलेल्या कैद्यांपैकी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी गुरुवारी दुपारी पळून गेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पळून गेलेल्या कैद्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडून आला नाही.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दररोज कारागृहाच्या विविध कामांसाठी पाठविण्यात येत असते. गुरूवारी सकाळी ८ वाजता कारागृहातील १९ कैदी कारागृहापाठीमागील गोरेवाडी येथील मोठा बगीचा येथे शेती कामासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर देखरेख ठेवण्यासाठी कारागृहाचे दोन कर्मचारी देखील हजर होते. दुपारी दोनच्या सुमारास शेती कामासाठी नेण्यात आलेले कैदी हे जेवणासाठी एकत्र जमले असता कैदी महम्मद इस्माईल इब्रीस हा उपस्थित नसल्याचे कारागृह कर्मचाऱ्यांचे लक्षात आले. कर्मचारी व कैद्यांनी मोठा बगीचा व आजुबाजुच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र कैदी महम्मद इब्रीस दिसून न आल्याने सदरील बाब कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कैदी महम्मद इब्रीस हा नजर चुकवून पळून गेल्याचे स्पष्ट होताच सदर माहिती नाशिकरोड पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी रेल्वे स्थानक, बसस्थानक, हॉटेल, लॉजिंग आदि ठिकाणी सर्वत्र तपासणी व शोधाशोध केली. सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे आदि पोलीस अधिकाऱ्यांनी कारागृहाचा मोठा बगीचा येथे भेट देऊन आजुबाजुला विचारपूस केली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा सुगावा लागु शकला नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
नाशिकरोड कारागृहातून कैदी फरार
By admin | Published: May 28, 2015 11:19 PM