सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावरील पांगरी शिवारातील बेकायदा विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळणाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मंगळवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.अमोल कुमार दिघे (२३), रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर हल्ली राहणार, उज्ज्वल नगर, मुसळगाव एमआयडीसी सिन्नर) असे संशियत आरोपीचे नाव आहे.सिन्नर-शिर्डी मार्गावर पांगरी शिवारात अमोल दिघे हा संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे विदेशी बनावटीचे पिस्तूल व दोन जीवंत काडतुसे मिळून आली. तसेच २६ हजारांची रोख रक्कम ही त्याच्याकडून जप्त करण्यात आली. वावी पोलिस ठाण्यात दिघे यांच्या विरोधात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. एस. जाधव पुढील तपास करीत आहेत.
पांगरी शिवारात विदेशी पिस्तूल बाळगणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:21 PM