नाशिक : मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो पाहता असे भ्रष्टाचारी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढणार असून, कोणत्याही परिस्थितीत मागच्या सरकारला सोडणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.गांधी शांतीयात्रेचे शहरात आगमन झाल्यानंतर तूपसाखरे लॉन्स येथील सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजप नेते सध्या वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत, त्यामुळे ते काहीही प्रतिक्रिया देत आहेत. तीन पक्षं मिळून सरकार स्थापन होणार असल्याने त्याला थोडा वेळ लागला. नवीन सरकार आल्यानंतर त्यांना काही वेळ द्यायला हवा. कोणतेही सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर टक्के आमदार समाधानी नसतात,असे त्यांनी कॉँग्रेसमधील नाराजीबाबत बोलतानासांगितले.भाजपने कोणाशीही युती केली तरी काही फरक पडणार नाही त्यांच्यापेक्षा आमची आघाडी मोठी आहे. आमच्या आघाडीत अनेक पक्षांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका आहेत. त्यांच्या मृत्यूची न्यायिक पद्धतीने चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
भाजप सरकारची प्रकरणे बाहेर काढणार: पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 1:32 AM