नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नाशिकमधील बहुतांशी रुग्णालये आणि दवाखाने बंद आहेत, मात्र वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ५० रुग्णालयांतच कोरोना संशयितांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित रुग्णांसाठी सर्व खासगी वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेली रुग्णालये सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला आयएमएने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रुग्ण सेवा पुन्हा सुरू होणार आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासंबंधी सूचना केल्यानंतर नाशिकच नव्हे तर राज्यातील बहुतांशी दवाखाने आणि रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे आपत्काळात दवाखाने आणि रुग्णालये बंद ठेवल्याबद्दल शासन आणि प्रशासनाकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कारवाई करण्याचे इशारेदेखील दिले. मात्र खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या वेगळ्याच अडचणी आहे त्या त्यांनी आयएमएच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या आहेत. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे पर्सोनल प्रोटेक्शन इक्यूपमेन्ट नाहीत तसेच साधे एन ९५ हे मास्क, हेजमेंट गाउन्स नाहीत. ग्लोज उपलब्ध होत नाहीत अशा त्यांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, रुग्णालयात अचानक कोरोना संशयित रुग्ण आला आणि नंतर त्याला कोरोना झाल्याचे आढळले तर रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी असे सर्वच क्वॉरंटाइन केले जातील, अशी एक भीती खासगी वैद्यकीय व्यावसायिकांत आहे. मात्र असे होणार नसल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले. निवडक ५० रुग्णालयांची यादी आयएमए देणार असून, तेथे कोरोना संशयित तपासले जाऊ शकतील बाकी अन्य रुग्णालयात अन्य नियमित उपचाराचे काम होऊ शकेल, असे मांढरे यांनी सांगितले.
शहरातील खासगी दवाखाने लवकरच होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 12:24 AM