नाशिक : शहरात कोरोनाबाधितांसाठी बेड पाहिजे असेल तर खासगी रुग्णालयात तो मिळेल, मात्र त्यासाठी २० हजार रुपये मोजावे लागतील. कन्सल्टिंग फीच्या नावाखाली अशा प्रकारे वसुली करण्याचा नवा धंदा उघड झाला आहे. यासंदर्भात प्रशासन काय चाैकशी करणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागून आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थानिक शाखेने, असे दलालीचे प्रकार असून कोणतेही रुग्णालय त्याच्याशी संबंधित व्यक्ती नियुक्त करीत नाही. त्यामुळे संबंधितांचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष डॉ. हेमंत साेननीस यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसाकाठी पाच ते सहा हजार नवे बाधित आढळत आहेत. त्यातच नाशिक शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उत्तर महाराष्ट्रातील तसेच अन्य जिल्ह्यांतूनही रुग्ण येत असल्याने सर्व रुग्णालयांचे बेड्स फुल झाले आहेत, असे सांगितले जाते. महापालिकेच्या हेल्पलाईन आणि वॉर रूमवर संपर्क साधून बेड मिळत नाही. ज्या रुग्णालयात बेड आहे असे सांगितले जाते तेथे नकारघंटाच ऐकायला मिळते आणि दुसरीकडे मात्र दलाली आता सुसाट हाेऊ लागल्याचे या ऑडिओ क्लिपवरून दिसत आहे.
नाशिकरोड येथील मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल रुग्णाच्या मित्राने एका व्यक्तीशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्या दोघांतील संवाद ऑडिओ क्लिपद्वारे व्हायरल झाला असून, त्यात त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात माणसे बसवून ठेवली आहेत. त्यामुळे बेड मिळून जाईल. परंतु त्यासाठी २० हजार रुपये कन्सल्टन्सी फी म्हणून द्यावे लागतील. हॉस्पिटलचे डिपॉझिट वेगळे भरावे लागेल, असे नमूद केले आहे. तीन ते चार रुग्णालयांत आपली माणसे बसवून ठेवली असून, ती योग्य तो निर्णय घेतील, असेही त्याने नमूद केले आहे. संबंधित व्यक्ती खरोखरच बेड मिळवून देईल की नाही किंवा रुग्णालयांशी तो संबंधित असल्याचेही स्पष्ट झालेले नसले तरी या क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.
असा आहे संवाद (संपादित अंश)
व्यक्ती - आमचा एक पेंशट आहे, स्कोर १६ आहे, आणि सध्या बिटको हॉस्पिटलमध्ये आहे.
एजंट - सॅच्युरेशन रिपोर्ट किती आहे.. ऑक्सिजन?
व्यक्ती - ९६ होता, नंतर ९५, ९२ झाला आणि आज जेवण झाल्यानंतर पुन्हा ९६ झाला..
एजंट - ठीक आहे. बेड देतो मी ॲव्हेलेबल करून पण कन्सल्टन्सी फी साधारण २० हजार असते बरं का सर..
व्यक्ती - टोटल खर्च किती असतो?
एजंट - ते नाही सांगता येणार मला, आमची फक्त कन्सल्टन्सी असते. तुम्हाला ॲव्हेलेबल करून देतो मग तेथे जाऊन तुम्ही डिपॉझिट काय असेल ते भरा आणि मेडिकलचा खर्च वेगळा..
व्यक्ती - तो खर्च वेगळा..?
एजंट - बेडच ॲव्हेलेबल नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एकेक एम्लॉईज बसून ठेवला आहे.
व्यक्ती - ठीक आहे कळवतो तुम्हाला..
एजंट - मला लगेच सांगा.
कोट....
नाशिकमध्ये कोणत्याही रुग्णालयात रुग्ण आणि व्यवस्थापन थेट संबंध आहे. कोरोना काळातदेखील नाशिकमधील सर्व रुग्णालये चांगली सेवा देत असून शक्य तेवढे बेड्स उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे संकटात नागरिकांच्या भावनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणीतरी करताना दिसत आहे. यात कोणत्याही रूग्णालयाचा संबंध नाही. त्यामुळे संबंधीत क्लीपमध्ये कोण व्यक्ती आहेत. याचा सायबर क्राईम मार्फत चौकशी करून कारवाई करावी.
- डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए नाशिक.