नाशिक : दहा हजार रुपये कर्जाच्या व्याजापोटी दीड लाख रुपयांची वसुली करूनही आणखी पैशांच्या मागणीसाठी कर्जदारास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देणारा खासगी सावकार संशयित विनोद चव्हाण (रा़रामवाडी) यास पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि़१४) गुन्हा दाखल करून अटक केली आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील शिंदेनगरमधील रहिवासी हरीश वल्लभभाई ठक्कर यांनी दोन वर्षांपूर्वी पत्नी आजारी असल्याने खासगी सावकार विनोद चव्हाणकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते़ या कर्जावर चव्हाण याने ठक्करकडून चक्रवाढपद्धतीने दीड लाख रुपये वसूल केले आहेत़ मात्र या उपरही गोदापार्कवर बोलवून धाक दाखवून पैशांची मागणी करून वसुली करीत होता़ पंचवटीतील मधुबन कॉलनीतील रहिवासी व ठक्कर यांचा मित्र राजू खंडेराव घोडके यानेही चव्हाणकडून सहा हजार रुपयांचे कर्ज घेतले असून, त्यापोटी दीड लाख रुपये वसूल केले आहेत़ सावकार चव्हाण याने ठक्कर यांना ८ फेब्रुवारीला फोन करून व्याजाच्या पैशांची मागणी केली़ ठक्कर यांनी पैसे देण्यास नकार देताच त्यांना गोदापार्क येथे बोलावण्यात आल्याने त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती़ दरम्यान, ठक्कर व घोडके हे दोघे गत शनिवारी पंचवटी स्टॅण्डकडून पायी जात असताना संशयित चव्हाण हा दोघा साथीदारांसह दुचाकीवर आला़ यानंतर पैशाची मागणी करीत मारहाण केली तसेच चाकूने वार करण्याचाही प्रयत्न केल्याचे ठक्कर यांनी तक्रारीत म्हटले आहे़ याप्रकरणी गुन्हा दाखल होताच संशयित विनोद चव्हाण यास अटक करण्यात आली़ (प्रतिनिधी)
पंचवटीतील खासगी सावकारास अटक
By admin | Published: February 16, 2017 1:35 AM