नाशिक : अनधिकृत विद्यापीठाच्या पदवीवरून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांचे वादळ उठलेले असतानाच आता त्यात राज्याचे जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन ही पात्र नसलेल्या व्यक्तीस स्वीय सहायक नेमणुकीवरून गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. आघाडी सरकारच्या काळात सलग काही वर्षे राज्यमंत्र्यांकडे आणि नंतर एका महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे स्वीय सहायक असलेल्या कर्मचाऱ्याची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या संपर्क कार्यालयात स्वीय सहायक म्हणून नेमणूक करण्याच्या निर्णयाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्याच उर्ध्व गोदावरी प्रकल्प कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या निम्नस्तरावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्वीय सहायक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे समजते. वस्तुत: महाराष्ट्र शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री सचिवालय / मंत्री / राज्यमंत्री कार्यालयाच्या आस्थापनेसाठी सचिवपदे निर्माण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहेत. या निर्णयातील ६ क्रमांकाच्या पानावर मंत्र्यांच्या स्वीय सहायकांची नियुक्ती करताना निम्नश्रेणी पदवीधारक स्वीय सहायक पदावरील नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाहीत, असे स्पष्ट म्हटलेले असताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असलेल्या या कर्मचाऱ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या संपर्क कार्यालयात स्वीय सहायक म्हणून नेमण्याबाबत जलसंपदा विभागाला पत्र दिल्याचे वृत्त असून, याबाबत एका स्थानिक खासदाराला विचारणा केली असता त्यांनीही अशी नियुक्ती झाल्याबाबत आपल्याला माहिती मिळाल्याचा दुजोरा दिला आहे. आघाडी सरकारच्या काळातील स्वीय सहायक घेऊ नयेत, या मुद्द्यावरून आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची मागे चर्चा होती. त्यातच कमरेला पिस्तूल लावून भाषण केल्याचा वाद शमतो न शमतो तोच पालकमंत्री गिरीश महाजन हे आता स्वीय सहाय्यक नियुक्तीवरून वादात सापडण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
आघाडी सरकारच्या काळातील नेमले खासगी सचिव?
By admin | Published: June 27, 2015 1:03 AM