नाशिक : राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हे आपल्या खासगी वाहनांवर लावून फिरतात, निवडणूक आयोगाने त्यालाही आक्षेप घेतला असून, तसे करणेदेखील राजकीय पक्षाचा प्रचार मानला आहे. त्यामुळे खासगी वाहनांवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, नाव, झेंडा, घोषवाक्ये दिसल्यास त्या वाहन मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्णात या आदेशाची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केली असून, त्यात म्हटले आहे की, लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय आॅटोरिक्षा, टेम्पो, मोटारसायकल व इतर खासगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्य लिहिणे इत्यादींवर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्यामुळे अशा खासगी वाहनांवर भरारी पथकामार्फत नजर ठेवण्यात येणार असून, तसा प्रकार आढळल्यास सदर वाहनाच्या क्रमांकावरून त्याच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना भरारी पथकाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी स्वत:च पक्षचिन्हे, झेंडा काढून टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश मंगळवार, १९ मार्च ते ४ मे २०१९ या कालावधीसाठी अमलात राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
खासगी वाहनांवरील पक्षचिन्ह, झेंड्यांना आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:40 AM