मोकळी मैदाने बनला मद्यपींचा अड्डा
नाशिक : शहर परिसरातील विविध भागांत असलेल्या अनेक मैदानांचा ताबा मद्यपींनी घेतला असून, सायंकाळपासूनच येथे मद्यपींचा वावर वाढला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत, येथे अनेक मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो, तसेच काही पडक्या, जुन्या इमारतींच्या काही भागांत अंधार असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत, मद्यपी त्या इमारतींमध्ये त्यांचा अड्डा बनवीत असल्याने, त्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सातपूरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : शहरातील सातपूर भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदकाम
नाशिक : शहरातील अनेक रस्त्यांवर खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. केबललाइन, गॅसलाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी खोदकामे केल्याने अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील कोणत्या रस्त्यांवरून जायचे तेच कळण्यास मार्ग नसल्याने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.
वाढत्या उन्हाचा सामान्यांना तडाखा
नाशिक : बहुतांश कामे बंद असल्याने हातावर पोट असलेल्या आणि रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांना घरीच थांबावे लागत आहे. त्यात वाढत्या उन्हाचे चटके सकाळपासून पत्र्याच्या घरांवर जाणवू लागल्याने आधीच कामाविना बसलेल्या नागरिकांना या उन्हाचा चांगलाच तडाखा बसू लागला आहे.
भाजीपाल्याच्या दरात वाढ
नाशिक : काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतरही शहरात येणाऱ्या भाजीपाल्याचा दर अद्यापही चढाच आहे. हातगाडीवरून येणाऱ्या विक्रेत्यांकडून त्यांना अद्यापही पूर्वीप्रमाणे भाजी उपलब्ध होत नसल्यानेच भाजीपाल्याच्या दरात वाढ कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पावसामुळे डासांमध्ये वाढ
नाशिक : शहरात पडून गेलेल्या पावसामुळे अनेक भागातील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांमध्ये आठवडाभरापासून डासांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली आहे. अगदी दिवसादेखील डास चावू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र धुरळा फवारणीला वेग देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.